राेहिणी नक्षत्राचे वाहन मेंढा असून मंगळवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. सूर्याच्या नक्षत्र प्रवेशावेळी एकही जलकारक ग्रह जलराशीत नसल्याने या नक्षत्रात कमी पावसाचे योग दर्शवितात. २५ मेचे चंद्रग्रहण पावसासाठी थोडीफार अनुकूलता दर्शविते. तसेच या नक्षत्रात केरळ व समुद्र किनाऱ्यावरील भागात कोकण, मुंबई परिसरात वादळी पावसाची शक्यता संभवते. २ जूननंतर उष्णतामान कमी होऊन थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे; परंतु नियमित व सार्वत्रिक पाऊस या नक्षत्रात होण्याचे योग दिसत नाहीत. दर्शविण्यात आलेला हा पावसाचा अंदाज पंचाग शास्त्रानुसार ग्रह व नक्षत्राच्या स्थितीवर आधारित आहे. तरी शेतकरी वर्गात हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजावर आधारित आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. रोहिणी नक्षत्रासोबत मंगळवारपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे नऊ दिवस सर्वाधिक तापमानाचे राहण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या उन्हाळ्यात तापमानामध्ये सतत बदल होत राहिला. सततच्या अवकाळी, वादळी पाऊस व ढगाळ वातावरणमुळे यंदा फारसा उन्हाळा जाणवला नाही; परंतु घाम फोडणाऱ्या नवतपांना मंगळवारी ढगाळ वातावरणात सुरुवात झाली. त्यामुळे पुढील दिवस चांगलेच तापदायक असणार, हे नक्की. कारण उन्हाळ्यात सर्वात जास्त तापणारे दिवस असा नवतपाचा लौकिक आहे. या दिवसात हवा जमिनीचे तापमान सर्वाधिक जास्त असते. नवतपाच्या या नऊ दिवसांचा संबंध पुढे येणाऱ्या पावसाच्या नऊ नक्षत्रांसोबत जोडला आहे. नवतप कालावधी ठरल्या अर्थाने उष्ण आणि शुष्क राहिला तर त्या वर्षी पाऊस उत्तम बरसतो. याउलट नवतपातील नऊ दिवस गारवा किंवा पाऊस पडल्यास त्या दिवसाच्या संबंधित पावसाचे नक्षत्र कोरडे जाते किंवा त्या नक्षत्रात पाऊस कमी पडतो, असा जाणकार शेतकऱ्यांचा अंदाज आहे. नवतपाच्या दिवसनिहाय येणारी पावसाची नक्षत्रे मृग, आर्द्रा, पुनर्वसू पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही नऊ नक्षत्र आहेत.
बॉक्स :
काय आहे नवतपा?
चंद्राला केंद्रस्थानी ठेवून वर्षभर सूर्याचे भ्रमण २७ नक्षत्रांमधून होत असते. असे पंचाग शास्त्र सांगते. त्यानुसार वर्षाचे ३६५ दिवस २७ नक्षत्रामध्ये विभागले आहे. ते विविध १२ राशींच्या अंतर्गत येतात. सरासरी एका नक्षत्राचा कालावधी हा १३ दिवसांपेक्षा थोडा अधिक असतो. सूर्याचा रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश झाल्यानंतर पुढचे नऊ दिवस नवतपा असे संबाेधले जाते.