गडचिरोली : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आहाराच्या बदलत्या सवयी, अमली पदार्थाचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. जीवनशैलीत बदल व अयोग्य सवयीसोबतच गंभीर आजार व उपचारप्रणाली विषयीची अज्ञानता यामुळे अनेकदा शेवटच्या स्टेजमध्येच रुग्णाला उपचार मिळत आहे.
रोहित्रांचा शासकीय इमारतींना धोका
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
केरोसीनअभावी ग्रामीण भागात अडचण वाढली
गडचिरोली : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने दिवा कसा लालावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील बहुतांश औषधविक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र,ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे कधीकधी अधिकची किंमत आकारली जाते. ग्राहक औषध विक्रेत्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून तेवढी रक्कम देतात.
गडचिरोलीत जागांचे भाव कडाडले
गडचिरोली : गडचिरोली शहरालगत चंद्रपूर मार्गावरच कृषक जमीन अकृषक करून प्लॉट विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे. शहरातील जमिनी ठरावीक लोक घेऊन पुन्हा विकण्याचे काम करीत असल्याने शहरात जागेच्या किमती वाढल्या आहेत. नागपूर शहरासारखेच दर गडचिरोली शहरातही जागेच्याबाबत झाले आहेत. गेल्या ५ वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी केल्यास ही बाब प्रकर्षाने दिसून येते.
कमलापूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा कुचकामी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र, सदर टॉवरला रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. परिणामी जनता त्रस्त झाली आहे.
रस्त्याच्या बाजूची झाडे धोकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मालेवाडा पीएचसीला रुग्णालयाचा दर्जा द्या
कुरखेडा : मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. मात्र, पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.
औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.
गंजलेल्या विद्युत खांबामुळे अपघाताचा धोका
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. त्यामुळे सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाले.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
अहेरी : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. हागणदारीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.
कुरखेडा तालुक्यातील गावांना लाईनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु, अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
देसाईगंज : प्रत्येक वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र, या ओपस स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने तेथे कचरा टाकला जात आहे. नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात स्वच्छतेचे काम मंदावल्याचे यावरून दिसून येत आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
एटापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
रेपनपल्ली-कमलापूर रस्त्याची दुरवस्था
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. तसेच दगड व गिट्टी बाहेर आली आहे. या रस्त्यावर असलेले पूलसुध्दा मोडकळीस आले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे अधिक प्रमाणात विस्तारले. त्यामुळे येथील गिट्टी पूर्णत: रस्त्याबाहेर पडली आहे.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहने कोसळून बळी गेला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरत आहेत.
घोट मदत केंद्राला पोलीस ठाण्याचा दर्जा द्या
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्रात नागरिकांच्या तक्रारी न स्वीकारता चामोर्शी येथे पाठविण्यात येते. घोट येथे असलेल्या पोलीस मदत केंद्राला पोलीस ठाण्याचा दर्जा प्रदान करण्यात यावा तसेच सुभाषग्राम गावाला घोट पोलीस मदत केंद्रात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.