सहा आरोपींना अटक : घोट वन परिक्षेत्रातील ठाकूरनगर येथील घटना लोकमत न्यूज नेटवर्क घोट : घोट वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ठाकूरनगर नियत क्षेत्रातील संरक्षित खंड क्रमांक १५३१ मध्ये विद्युत प्रवाह लावून रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने सहा आरोपींना अटक केली. सदर शिकारीची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रमोद प्रेमवाल राजपूत (२७) रा. तुमडी याला वनाधिकाऱ्यांनी प्रथम ताब्यात घेतले. त्याच्याकडून अधिक माहिती घेतल्यानंतर मिरनाल माखन मंडल (३०), जीवन ज्योती मंडल (३०), गौरंग गोलक मैत्र (३३), धिरज कोकण सरकार (२६) सर्व रा. ठाकूरनगर व सपन बावेज हलदर (४५) रा. सुभाषग्राम या आरोपींना अटक करण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी रानडुकराचे मांस, इलेक्ट्रिक मशीन व रानडुकराच्या शिकारीसाठी वापरावयाचे साहित्य आरोपींकडून जप्त केले. सदर कारवाई घोटचे वन परिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे यांच्या मार्गदर्शनात रेगडीचे क्षेत्र सहायक पी. आर. शिरपूरकर, वनरक्षक आर. जी. बारसिंगे, एस. पी. धानोरकर, के. एच. भांडेकर, डी. एच. चिव्हाने आदींनी केली. रानडुकराच्या शिकार प्रकरणातील सर्व सहा आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३२ (जे) व ३३ (डी) अंतर्गत तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४५ व ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास वन परिक्षेत्राधिकारी तनपुरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
विद्युत प्रवाहाने केली रानडुकराची शिकार
By admin | Published: May 08, 2017 1:23 AM