अधिकचा भाव : सिरोंचा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींनी केले तेंदू संकलननागभूषणम चकिनारपुवार । लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चालू वर्षात सिरोंचा तालुक्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींनी स्वत:च तेंदूपत्ता संकलन केले आहे. तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून ग्रामसभांना सुमारे १८ कोटी ११ लाख २ हजार ७२ रूपयांची रॉयल्टी प्राप्त झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीत जवळपास २० पट वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यात उत्तम दर्जाचा तेंदूपत्ता आहे. त्यामुळे इतर तालुक्यांच्या तुलनेत सिरोंचा तालुक्यातील तेंदूपत्त्याला कंत्राटदारांची विशेष मागणी राहत असून अधिकचा भाव देण्यास ते तयार होतात. पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे तेंदूपत्त्यातून प्राप्त होणारे पूर्ण उत्पन्न खर्च व मजुरांची मजुरी वजा जाता ग्रामसभेला उपलब्ध होते. या उत्पन्नातून अनेक ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. या रकमेतून कोणती विकास कामे करायची, याचा पूर्ण अधिकार ग्रामसभेला राहते. तेंदूपत्त्याचा हंगाम जवळपास १० ते १२ दिवस चालते. यातून स्थानिक मजुरांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होते. १० ते १२ दिवसांच्या रोजगारात प्रती व्यक्ती १० ते १२ हजार रूपये उत्पन्न उपलब्ध होते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी नागरिकांच्या उड्या पडतात. मागील वर्षी पहिल्यांदाच तेंदूपत्ता संकलन ग्रामसभांच्या मार्फत करण्यात आले. अनेक ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचा व तेंदूपत्त्याचा भाव माहित नसल्याने काही कंत्राटदारांनी स्थानिक नागरिकांची दिशाभूल करून अत्यंत कमी किमतीत तेंदूपत्ता संकलन केले. यावर्षी मात्र वन विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिल्याशिवाय तेंदूपत्त्याची विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामसभांना दिले होते. जाहिरातीमुळे कंत्राटदारांमध्ये स्पर्धा वाढून मागील वर्षीच्या तुलनेत १० ते १२ पटीने अधिक भाव मिळाला आहे. यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला आहे. उत्पादनही अधिक झाले. परिणामी रॉयल्टीमध्ये वाढ झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच १८ कोटींची रॉयल्टी मिळाली आहे.१५ कोटींनी उत्पन्न वाढलेमागील वर्षी ३५ ग्रामपंचायतींनी सुध्दा तेंदूपत्ता संकलन केले होते. या माध्यमातून केवळ ३० लाख ४२ हजार १५७ रूपयांची रॉयल्टी उपलब्ध झाली होती. यावर्षी मात्र तेंदूपत्ताचा भाव कडाडला होता. काही ठिकाणी १९ हजार रूपये प्रती गोणीपर्यंत भाव गेला. तेलंगणा राज्यातील कंत्राटदारांनी तेंदू संकलनासाठी स्पर्धा निर्माण केली होती. परिणामी यावर्षी १८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत १५ कोटी १७ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्न वाढले आहे.
तेंदूपत्त्यातून १८ कोटींची रॉयल्टी
By admin | Published: June 12, 2017 12:59 AM