वैरागड : ‘ऐकून घे शासनाने
सांगितले जे उपाय, तूच आहे तुझा ‘वाली’ दुसरा कोणी नाय,
भावासाठी धाव रे गड्या, गावासाठी धाव..!’’ असे सूरमयी गीत गाऊन चित्रफितीच्या माध्यमातून काेराेनाबाबत जागृती करण्याचे काम काेरचीचे प्राध्यापक करीत आहेत. त्यांच्या ह्या जनजागृतीवरील गीताला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. काेराेना याेद्धयांप्रमाणेच तेसुद्धा लाेकांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्याचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जाेपासत आहेत.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासन विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करीत आहे. यासाठी आराेग्य विभागाचे कर्मचारी तसेच विविध विभागही काम करीत आहेत. साेशल मीडियाच्या माध्यमातूनही काेराेनाबाबत जागृती हाेत आहे. परंतु स्थानिक स्तरावर चित्रफितीच्या माध्यमातून काेराेना विषाणूच्या विराेधात जागृती करण्याची संकल्पना काेरचीच्या वनश्री काॅलेजचे प्राध्यापक प्रदीप चापले यांना सूचली. विशेष म्हणजे, ते गाेंडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा याेजना समन्वयक सुद्धा आहेत. काेराेनाचा संसर्ग राेखण्याचे काम शासन-प्रशासन करीत असताना सारेच हतबल झाले आहेत. अशास्थितीत काेराेनाचा संसर्ग राेखणे हाच एकमेव उपाय आहे. ही गरज ओळखून प्रा. प्रदीप चापले यांनी काेराेनाबाबतची जनजागृती करण्यासाठी स्वत: गीत रचले व संगीत देऊन स्वत:च गायन केले. अशाप्रकारे त्यांनी ही जनजागृतीसाठी चित्रफीत तयार केली. शासनाने सांगितलेले उपाय प्रा. चापले यांनी गीतातील रचनेच्या माध्यमातून सांगितले. ‘घरामंदी राय रे गड्या... घरामंदी राय..!’ या ओळीतून ते लाेकांना घरातच राहण्याचा सल्ला देतात, अशा सूरमयी व मनाला सहज पटणाऱ्या व चटका लावणाऱ्या काव्यरचनेतून प्रा. प्रदीप चापले यांनी काेराेना संकटकाळात नागरिकांना स्वत:चा संसर्गापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
बाॅक्स
मृत्यूच्या धाेक्याची भावनिक साद
प्रा. चापले यांनी अगदी साध्या व साेप्या झाडीपट्टीच्या बाेलीभाषेत काेराेनाबाबतचे जनजागृती गीत गायले आहे. प्रत्येक चाराेळीला भावार्थ व भावनिक साद आहे. ‘कुठून मिळेल लेकरांना दुसरे बाप अन् माय..!’ या ओळीतून मृत्यूचा धाेका भावनिक साद घालून सांगतात. काेराेना योद्धा म्हणून काम करणारे डॉक्टर, पोलीस हे आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत, असे सांगताना काेराेना प्रतिबंधक लस घेण्याचा आग्रह करतात. कठिण काळात माणुसकीचा धर्म पाळून सगळ्यांनी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन करताना ते म्हणतात, ‘भावासाठी धाव रे गड्या, गावासाठी धाव; भुकेलेल्या पोटासाठी कर काहीतरी उपाय..!’