सिराेंचा तालुक्यात आजपर्यंत भौतिक सुविधांचे जाळे पसरविण्यात आले असले तरी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात फारसे काही घडले नाही. तालुक्यातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधांकरिता अद्यापही दुसऱ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यात केवळ रस्त्यांचा विकास केला जात आहे; परंतु आराेग्य व शैक्षणिक विकासाबाबत काहीच उपाययाेजना दिसून येत नाही. दुर्गम भागातील रेंगुठा, झिंगानूर, येनलाया, पातागुडम, टेकडा, रमेशगुडम आदींसह अन्य भागातील अनेक नागरिक वैद्यकीय उपचारार्थ शेजारील तेलंगणातील विविध जिल्ह्यांत धाव घेत आहेत. सिरोंचा शहरातील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची मर्यादा आहे; परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने बेड अपुरे पडतात. त्यामुळे तालुक्यात वैद्यकीय, तसेच शैक्षणिक साेयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
बाॅक्स
रिक्त पदांमुळे कार्यालये प्रभारींवर
सिराेंचा तालुक्यात ३९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील अनेक कार्यालयांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. प्रभारी अधिकारीच अनेक महत्त्वपूर्ण कार्यालये सांभाळत आहेत. याशिवाय ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका कर्मचाऱ्याला अनेक गावांचा प्रभार सांभाळावा लागत आहे.