गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
कठड्यांअभावी चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. यामुळे पूल ओलांडताना वाहन चुकीने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर रात्री व दिवसा वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
फूटपाथ वाढल्याने रहदारीस अडथळा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इंदिरा गांधी चौक परिसरात मार्गांवर फूटपाथ दुकानदारांनी विविध प्रकारच्या साहित्यांचे दुकान लावले आहे. त्यामुळे चौक परिसरात तसेच त्रिमूर्ती चौकात रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. उपाययोजनांबाबत प्रशासन सुस्त आहे.
बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा
सिरोंचा : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएल पासून वंचित आहेत.
अरुंद पूल दुरूस्त करण्याची मागणी
गुड्डीगुडम : सिरोंचा महामार्गावर नंदीगावजवळ अरुंद व ठेंगण्या स्वरूपाचा राल्लावागु नाल्यावर पूल आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीची मागणी होऊन संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्गावर जड वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणचा पूल अरुंद असून तो कमी उंचीचा आहे. शिवाय या पुलावर कठड्यांची व्यवस्था नाही.
बेलगट्टा माल येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील घोट-चामोर्शी मार्गावरील बेलगट्टा माल येथे प्रवासी निवारा व हातपंप देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
अतिरिक्त वीज देयकाने नागरिक त्रस्त
एटापल्ली : ग्रामीण भागात कमी वीज वापर करणाऱ्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे अधिक देयक आकारले जात असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अतिरिक्त वीज देयकामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.