लाेकमत न्यूज नेटवर्कजारावंडी : कोरोना विषाणूच्या भीतीने राज्यात आजपर्यंत शाळा बंद आहेत. शाळा बंदचा जास्तीत जास्त परिणाम ग्रामीण व दुर्गम भागात झाल्याचे चित्र पाहायला मिळते. इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षण घेणारे जि.प.शाळेतील विद्यार्थी चक्क अभ्यासक्रमच विसरलेे असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटअभावी ऑनलाईन शिक्षण कुचकामी ठरत असून ग्रामीण विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रभावी नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ८० टक्के पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. जारावंडीसारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्याने शालेय अभ्यासक्रम विसरले आहेत. १ ते १०० पर्यंतचे पाढे म्हणता येत नाही. मराठी भाषेतील वाचन व लेखन अचूकरित्या येत नाही. परिसर आदिवासीबहुल असल्याने शिक्षणाचा प्रसार कमी आहे. काही वर्षांपूर्वी आदिवासी समाजाची मुले शाळेत जायला घाबरत होती. परंतु शासनाने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपाययोजना करून शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची गो़डी निर्माण केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पटसंख्या वाढली आहे. परंतु आता शाळा प्रत्यक्ष भरत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली. पालकांसाेबत शेतात जाऊ लागली आहे.
बरेच पालक जागरूक नाहीतदुर्गम भागातील बऱ्याच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांच्याकडे स्मार्ट फाेनचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या साेयीसुविधा, तज्ज्ञ शिक्षक व तंत्रज्ञानाचा वापर याबाबत बरेच पालक अनभिज्ञ आहेत. कारण ग्रामीण भागात अशिक्षित पालकांची संख्या माेठी आहे. परिणामी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी यंदा गुणवत्तेत मागे पडणार आहेत. अभ्यासाऐवजी ते विविध खेळात मग्न असल्याचे दिसून येते.