कोरची : पेट्रोल, डिझेल व गॅसची सतत दरवाढ करून नागरिकांची लूट व महागाईचा आगडोंब निर्माण करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदाेलनातून निषेध केला.
लॉकडाऊनच्या काळात २०हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता सुरू आहे. पेट्रोलची दरवाढ होत असल्यामुळे किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिली, तर लवकरच पेट्रोल दराची ‘सेंच्युरी’ आणि वाहनधारकांची ‘शंभरी’ भरेल. इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालविण्याचे तंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने विकसित केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जनतेची लूट करण्याचा आरोप करत विचारले की, हेच तुमचे अच्छे दिन का? कोरोना काळात संपूर्ण देश आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. लोकांकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत आणि हे सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईचे ओझे वाढवत आहे, असा आराेप कार्यकर्त्यांनी केला. रायुकाँचे जिल्हा सरचिटणीस कुलदीप सोनकुसरे यांच्या उपस्थितीत व रायुकाँचे तालुका अध्यक्ष स्वप्नील कराडे, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे व शहर कार्याध्यक्ष चेतन कराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कार्यकर्ते आनंद पंधरे, हेमंत ढवळे, चंद्रशेखर वालदे, किशोर मडावी, वामन नंदेश्वर, राजेंद्र साहारे, दिनेश मेश्राम, विकेश उंदीरवाडे, रवी नंदेश्वर, सिद्धार्थ जांभूळकर, दीपक मोहुर्ले, बस्तर हलामी, उमरखान पठाण आदी उपस्थित होते.