लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : काेराेनाचा संसर्ग झाल्याने तापाने फणफणत असलेल्या गराेदर मातेची आराेग्य विभागाच्या प्रयत्नामुळे सुखरूप प्रसूती झाली. भामरागड तालुक्यातील ताडगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या काेसफुंडी गावातील माना सुधाकर काेसावी या गराेदर मातेला हेमलसा येथील लाेकबिरादरी दवाखान्यात आराेग्य तपासणीसाठी आणण्यात आले हाेते. यावेळी मानाला ताप आला हाेता. तिला काेराेना तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविले असता, तिचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. सुखरूप प्रसूतीसाठी तिला दवाखान्यातच भरती राहण्याचा सल्ला डाॅक्टर, तहसीलदार अनमाेल कांबळे, ठाणेदार किरण रासकर यांनी दिला. मात्र ती कुणाचेही न मानता स्वगावी परत गेली. ही बाब तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सदर मातेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर आराेग्य सेविका संगीता वाढणकर, आशा वर्कर अनिता रंजित एक्का, अंगणवाडी सेविका देविका परसलवार हे सर्व या गराेदर मातेला सर्वजण भेट देऊन तिची तपासणी करीत हाेते. प्रसूती जवळ आल्यानंतर रुग्णालयात भरती हाेण्याचा सल्ला आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिला. मात्र रुग्णालयात भरती हाेण्यास त्या महिलेने नकार दिला. शेवटी नाइलाजास्तव गृहविलगीकरण करून त्या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. आता बाळ व माता दाेघेही ठणठणीत आहेत, अशी माहिती आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली.