लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीने एका गोंडस पिलाला मंगळवार १८ डिसेंबर रोजी पहाटेला जन्म दिला. या नवजात मादी पिलाचे नाव ‘सई’ असे ठेवण्यात आले आहे. आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या नऊवर पोहोचली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे हत्ती कॅम्पमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर हत्ती कॅम्पमध्ये आतापर्यंत मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य, रूपा हे आठ हत्ती होते. राणीच्या पिलामुळे या संख्येत एकाची भर पडून हत्तींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कमलापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम. खेमलापुरे, गुड्डीगुडम येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भाऊ राऊत, कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी जी. एम. लांडगे यांच्या देखरेखीखाली प्रसुती प्रक्रिया सुरळीत आटोपली. सई ही सुदृढ व सशक्त असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिचा जन्म होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सई’ असे नाव निश्चित केले आहे.नवीन पिल्लाच्या आगमनामुळे कमलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलापूर हत्तीकॅम्प परिसराचा निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा, यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.पर्यटकांची संख्या वाढणारकमलापूरचा जंगलव्याप्त परिसर डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. त्यातच हत्ती कॅम्पने यामध्ये आणखी भर टाकली आहे. कमलापूर येथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही. थांबण्याची सुविधा नाही. तरीही दरवर्षी हजारो पर्यटक कमलापूर येथील हत्ती कॅम्पला भेट देऊन निसर्गसौंदर्य न्याहाळतात. सोबतच वन्यजीव असलेल्या हत्तींचेही दर्शन घेतात. नवीन पिलू आपल्या आईच्या मागे धावताना बघणे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे कमलापूर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.
हत्ती कॅम्पमध्ये झाले ‘सई’चे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:08 AM
येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीने एका गोंडस पिलाला मंगळवार १८ डिसेंबर रोजी पहाटेला जन्म दिला. या नवजात मादी पिलाचे नाव ‘सई’ असे ठेवण्यात आले आहे. आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या नऊवर पोहोचली आहे.
ठळक मुद्देराणीने दिला मादी पिलाला जन्म : कमलापूरच्या हत्तींची संख्या पोहोचली नऊवर