लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा काही ठिकाणी घडलेल्या अनुचित प्रकारांवरून पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये सुरक्षा समितीसह सखी सावित्री समिती गठित करून तक्रार पेट्या बसविल्या जाणार आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गुरूवारी पार पडलेल्या मुख्याध्यापकांच्या आभासी बैठकीत दिले.
मुलींच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दैने यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आदिवासी विभागांतर्गत आश्रम शाळा, समाजकल्याणच्या आश्रम शाळा आदींच्या मुख्याध्यापकांची आभासी पद्धतीने बैठक घेतली. दरम्यान, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शासन निर्णयातील तरतुदी स्पष्ट करून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या वेबसाइटबाबत आणि त्यातील सुविधांबाबत माहिती सर्व शाळांमध्ये नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याची सूचना दिली.
मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. वेळोवेळी तक्रार पेटी उघडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तर शाळेची मान्यता होणार रद्द
- जिल्ह्यातील सर्व शाळा व शाळेच्या परिसरात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, या बाबीचे पालन न झाल्यास शाळेचे अनुदान रोखणे, शाळेची मान्यता रद्द करणे, आदी कारवाई केली जाणार आहे.
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे, चारित्र्य पडताळणीकरून पोलिसांकडून अहवाल घेणे, सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.
दारू पिऊन शाळेत जाणे पडणार महागात शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाने तर दक्ष राहणे आवश्यकच आहे. सोबतच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किवा अन्य कोणतीही व्यक्ती शाळेत दारू पिऊन येणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले.
अनुचित घटना दडविल्यास... शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार उघडल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन, संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब २४ तासांच्या आत कळवावी. सदर अशी अनुचित घटना दडवून ठेवल्यास संबंधित व्यक्ती, मुख्याध्यापक, संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील.