देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा येथे वाहतुकीची साधने भरपूर प्रमाणत आहेत. गावापासून काही अंतरावरच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर अवैध व्यावसायिक घेत आहेत. नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत. रेतीच्या अवैध उपशामुळे नदीपात्र खोलगट झाले आहे. अंदाजे हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी झाला आहे. लाखाे ब्रासपर्यंत रेतीचा उपसा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैनगंगा नदीच्या रेती घाटाच्या लिलावावर पर्यावरण विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा एकही रेती घाट लिलावात काढला नाही. शिवाय तालुक्यातील अन्य रेती घाटांचे लिलाव झाले नाही. याचाच फायदा घेत वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे सुरू आहे. त्यासाठी कधी छुपे पाठबळ तर कधी महसूल यंत्रणेला हुलकावणी देऊन आपले अवैध काम व्यवस्थित पार पाडले जात आहे. महसूल प्रशासन आहे तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
बाॅक्स
ट्रॅक्टरधारकांचे ऑनलाइन धागेदाेरे
काेंढाळा वैनगंगा नदी घाटावरून रात्री अवैध रेती तस्करी हाेत असताना महसूल विभागाचे अधिकारी गाढ झाेपेत असतात. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांच्या घरापासून पाळत ठेवण्यासाठी रेतीतस्कर माणसे पाेसतात. अधिकारी जागे हाेऊन कारवाई करण्यासाठी बाहेर पडल्यास त्याची माहिती रेतीतस्करांना दिली जाते. वैनगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही या खड्ड्यांमध्ये रेती भरून रस्ता सुयाेग्य करण्यात आला आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व संपर्कासाठी जाळे पसरले आहे. सर्वत्र लक्ष ठेवून रेतीची तस्करी केली जाते.