लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील विविध घाटांवरून रेती तस्करी जाेरात सुरू आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने रेती तस्करांचे फावत चालले आहे. चामोर्शी तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून, बाजूलाच वैनगंगा नदी आहे. नदीकाठच्या गावागावात घाट निर्माण झाले आहेत. सर्व घाटांवर उच्च प्रतीची रेती आहे. तालुक्यातीलच नव्हेतर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक रेती तस्कर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चामोर्शीला पायधूळ झाडतात. जिल्ह्याबाहेरील रेती तस्कर, चामोर्शी तालुक्यातील रेती ठेकेदार व महसूल विभागातील कर्मचारी यांची साटेलोटे निर्माण होऊन बहुमोल रेतीचे अवैध उत्खनन करण्याचा सपाटा नियमित सुरू आहे. रेती तस्करीची तक्रार हाेतातच एखाद्यावेळी तस्कराचा ट्रॅक्टर पकडून अवैध रेती उत्खननावर निर्बंध असल्याचे दर्शविले जाते. काही दिवसातच रेतीतस्कर वेगवेगळे फंडे वापरून अवैध रेती उत्खनन सुरूच ठेवतात. अवैध उत्खननातील रेतीसाठ्याची नियमानुसार लिलाव प्रक्रिया पार पाडली जाते. ज्याने अवैध उत्खनन केले त्याच व्यक्तीला लिलाव कसा मिळेल याचे आधीच प्रयोजन केले जाते. लिलाव झाल्यावर त्याच ढिगावर परत नदीतील चाेरीची रेती टाकून ढिगावरून रेतीची चाेरी केली जाते. मोहोर्ली, दोटकुली, गणपूर, आमगाव महाल, वेलतूर तुकूम अशा दुर्गम गावाच्या नदीकाठावर अवैध रेती उत्खनन करण्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे.
महसूल विभाग म्हणते रेती तस्करी हाेतच नाहीमहसूल विभाग सांगतो की, अवैध रेती चाेरीवर निर्बंध घातले आहे तसेच अवैध उत्खननाचा नियमानुसार लिलाव करण्यात येतो. म्हणजे खरे काय? अवैध रेती उत्खननावर निर्बंध आहेत तर लिलाव कशाचा केला जातो. निर्बंध असणे वा अवैध उत्खनन होणे एकाचवेळी दोन बाबी कशा होतात, असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे.