वैरागड : सन २०१३-१४ या वर्षातील रेतीघाट परवान्याची मुदत संपल्यानंतरही रेतीचा नदीतून उपसा करणाऱ्या रेती तस्कराला वैरागड येथील गोरजाई नदीघाटावर महसूल विभागाने कारवाई करून ट्रॅक्टरसह रंगेहात पकडले. २०१३-१४ या वर्षात वैरागड- मानापूर घाट लिलावात घेणारे नरेश मोतिराम आकरे हे मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या रेतीचा उपसा करीत होते. आकरे यांच्यावर महसूल विभागाने अनेक दिवसांपासून पाळत ठेवली होती. १८ नोव्हेंबर रोजी महसूल विभागाने स्मशानभूमि घाटावर अवैध रेतीची वाहतूक करतांना आकरे यांना सापळा रचून आज सकाळी ८ वाजता एम. एच.- ३३ एफ- १४३२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरसह रंगेहाथ पकडले. रेतीघाट लिलावाची मुदत ३१ सप्टेंबर २०१४ पर्यंतच होती. तरी देखील ठेकेदार आपली मनमानी करून अवैधरित्या रेतीचा उपसा करीत होते. त्यामुळे महसूल विभागाला लाखो रूपयांचा फटका बसत होता. आज महसूल विभागाने कारवाई करून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला गोरजाई डोहघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेतीसहीत पकडण्यात आले. त्यानंतर महसूल अभिनियमानुसार पंचनामा करून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आरमोरीचे तहसीलदार कुळसंगे यांच्याकडे कागदपत्र सोपविण्यात आले आहेत. यावेळी मंडळ महसूल अधिकारी व्ही. डी. घरत, तलाठी बी. एन. कुबडे, कोतवाल बंडू कांबळे, पोलीस पाटील गोरख भानाकर आदी उपस्थित होते. आकरे हा लिलाव परवाना संपल्यानंतरही अनेक दिवसांपासून मनमर्जीप्रमाणे रेतीची वाहतूक करीत होता. रेती घाटांचे आपल्याकडे कंत्राट आहे असा देखावा तो करीत होता. महसूल विभागाच्या कारवाईमुळे अवैध रेती तस्करीला आळा बसणार आहे. (वार्ताहर)
रेती तस्कराला रंगेहात पकडले
By admin | Published: November 18, 2014 10:56 PM