जि. प. अध्यक्षांचे प्रतिपादन : कब-बुलबुल जिल्हास्तरीय मेळावागडचिरोली : बालपणातच चांगले संस्कार व चांगल्या सवयी लावल्यास या सवयी जीवनभर टिकतात. कब-बुलबुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यास फार मोठी मदत होते. त्यामुळे कब-बुलबुलमध्ये जिल्हाभरातील सर्वच शाळा सहभागी व्हाव्या. पुढील वर्षी या मेळाव्याला उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हा परिषद स्काऊट-गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने गटसाधन केंद्राच्या प्रांगणात जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणूून जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे, स्काऊट-गाईडचे आयुक्त विनोद भोसले, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, प्राचार्य वाय. आर. मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कब-बुलबुल मेळाव्यात पहिली ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी मित्र मेळावा, चित्रकला व शारीरिक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी राजू आकेवार, शिक्षण विभागाचे बालकिशन अजमेरा यांच्यासह स्काऊटचे मनोज निंबारते, सुनील आर्इंचवार, येलम पुलकर, प्रमोद दशमुखे, नितेश झाडे, माधुरी जवणे, चिलबुले, धात्रक, घुगरे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
बालपणीचे संस्कार जीवनभर टिकतात
By admin | Published: March 01, 2016 12:59 AM