गडचिराेली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाची पहिली अधिसभा १७ जानेवारी राेजी मंगळवारला पार पडली. या अधिसभेचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित होते. या सभेत गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
संत तुकाराम महाराजांचे साहित्य व विचार याबाबत व्यापक अध्ययन व संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अध्यासन केंद्र सुरू करणे महत्त्वाचे आहे. संत तुकाराम महाराजांच्या काव्याच्या आधारे समकालीन इतिहासाचे संशोधन विद्यार्थ्यांना करता येणार आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी संत तुकाराम महाराजांच्या काव्यातील विचार प्रेरक ठरणार आहेत. या विषयाचा प्रस्ताव पाठवून याबाबत शासनाकडे पाठपुरावा करता येईल, कुलगुरू डाॅ. बाेकारे यांनी सभेत सांगितले.
चिमुर येथे विद्यापीठाचे सुविधा केंद्र व पेपर मूल्यांकन केंद्र निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. यावर उत्तर देताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, चिमूर येथे सुविधा केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून पेपर मूल्यांकन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे ठेवण्यात येईल, असे सांगितले.
गोंडवाना विद्यापीठाद्वारे नवनिर्मित सांस्कृतिक सभागृहाला नागपूर विद्यापीठाचे पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. राष्ट्रीय छात्र सेनेकरिता उत्कृष्ट कॅडेट्स व उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार देण्याबाबतच्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले आणि सर्व संमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला. पुणे, मुंबईपर्यंत आपले विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पोहोचू शकत नाही त्यामुळे एमपीएससी आणि युपीएससीच्या पूर्व तयारीसाठी सारथीचे तसेच टीआर टीआयचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देत प्रस्ताव मान्य करण्यात आला. ही अधिसभा सकाळी ११.३० ला सुरू झाली तर कामकाज रात्री नऊ वाजेपर्यंत चालले. या सभेचे सदस्य सचिव म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी काम पाहिले.
ऑनलाईन पोर्टल सुरू हाेणार
गोंडवाना विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील अध्यापकांच्या विविध समस्या आणि प्रश्न विद्यापीठाकडे मांडण्यासाठी व त्या सोडवणुकीसाठी विद्यापीठाने ऑनलाईन पोर्टल तयार करावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याने ऑनलाइन पोर्टल सुरू हाेणार आहे.