गडचिरोली (लाहेरी) : भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. याशिवाय सात वर्गासाठी केवळ दोनच वर्गखोल्या आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाने शिक्षक व वर्गखोल्यांची व्यवस्था न केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी लाहेरी जि.प. शाळेला कुलूप ठोकले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने २७ जून २०१८ रोजी भामरागडच्या बीडीओंना लेखी निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली होती. वर्गखोल्यांची व्यवस्था करावी, धूळखात पडलेल्या संगणक संचाची दुरूस्ती करावी, डिजिटल शाळेसाठी पुरविण्यात आलेल्या एलईडी टीव्हीचा वापर करण्यात यावा, मागील सात वर्षांपासून रिक्त असलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद भरण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत होते. त्यामुळे मागण्या मंजूर न झाल्याने शाळा समितीचे सभापती सुरेश सिडाम यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांकडून लाहेरी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.