मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या टोकावरील ज्या सिरोंचा तालुक्यातून महाराष्टष्ट्र आणि नंतर छत्तीसगडमध्ये प्रवेश करून आपली चळवळ वाढविली, त्या सिरोंचा तालुक्यातूच आता नक्षल चळवळ हद्दपार होण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारच्या चकमकीत पोलिसांनी नक्षल नेता सुनील कुळमेथे व त्याची पत्नी स्वरूपा यांचे एन्काऊन्टर केल्यानंतर दक्षिण गडचिरोलीत या चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम नक्षली दहशतीखाली आलेल्या सिरोंचा तालुक्याची नक्षलमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे.४०-५० वर्षांपूर्वी केवळ आंध्र प्रदेशातील काही जिल्हे आणि पश्चिम बंगालमध्ये नक्षल चळवळ उदयास आली होती. महाराष्टष्ट्र , छत्तीसगडमधील जंगलाचा प्रदेश चळवळ फोफावण्यासाठी पोषक असल्याचे हेरून तत्कालीन आंध्र प्रदेशात येणाऱ्या (आताचे तेलंगणा) करीमनगर जिल्ह्यातून गोदावरी नदी पार करून नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. हळूहळू पाय पसरत आपला जम बसविला. अलिकडे सिरोंचा तालुक्यात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्या असल्या तरी ‘रेस्ट झोन’ म्हणून या तालुक्याला नक्षली सुरक्षित ठिकाण समजत होते. पण गेल्या ६ डिसेंबरला याच तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात पोलिसांनी एकावेळी ७ नक्षलींचा बळी घेतला. त्या धक्क्यातून पुरते सावरत नाही तोच मंगळवारी (दि.३) झालेल्या चकमकीत पुन्हा तिघांचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. यामुळे तालुक्यावरील पोलिसांची पकड घट्ट झाल्याचे सिद्ध होत आहे.या चकमकीत ठार झालेला विभागीय समिती कमांडर सुनील उर्फ विलास मारा कुळमेथे आणि त्याची पत्नी स्वरूपा उर्फ आमसी पोचा तलांडी हे सिरोंचा तालुक्यात चळवळीचे काम पहात होते. त्यांच्या संपण्याने त्या परिसरात चळवळ बिथरली असून नक्षल्यांचे या तालुक्यातील अस्तित्वच संपुष्टात येईल, असे पोलिसांना वाटत आहे. जर तसे झाले तर राज्यात नक्षल चळवळीची सुरूवात आणि चळवळीच्या शेवटाचीही सुरूवात करणारा तालुका म्हणून सिरोंचाचे नाव नोंदविले जाईल.
१९८२ मध्ये पहिली हत्यामहाराष्ट्र त प्रवेश केल्यानंतर ३ आॅक्टोबर १९८२ रोजी नक्षलींनी आमरडेली परिसरात नारायण राजू मास्टर या शिक्षकाची हत्या केली होती. महाराष्ट्रत नक्षल्यांकडून झालेली ती पहिली हत्या होती. त्यानंतर गेल्या ३६ वर्षात जवळपास ५०० निरपराध नागरिकांच्या हत्या नक्षल्यांनी केल्या आहेत.
मृतात महिला नक्षलींचे बळी वाढलेपूर्वी महिलांचा वापर प्रत्यक्ष बंदूक घेऊन लढण्यासाठी होत नव्हता. मात्र अलीकडे भरती होणाऱ्या तरुणांची संख्या कमी झाल्याने महिलांनाही बंदूक चालवावी लागत आहे. त्यांनाही नक्षल्यांकडून सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असले तरी पुरूषांच्या तुलनेत आणीबाणीच्या प्रसंगी स्वत:चा बचाव करण्यात त्या कमी पडतात. वरिष्ठ नक्षल नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला नक्षलींकडे दिली जात असल्यामुळे पोलिसांच्या गोळीची पहिली शिकार त्याच ठरतात.