गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीदरम्यान काही उमेदवार निवडून येण्यासाठी दारू किंवा पैशाचे आमिष दाखवितात. दारूच्या पुरात पार पडलेल्या निवडणुकीमुळे गावाचे वाटोळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी ''दारूमुक्त निवडणूक'' करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत १४ गावांनी सुरुवात करून ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त करण्याचा निर्धार केला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्याचा गावांचा मानस आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय व अपक्ष मिळून नऊ उमेदवारांनी मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही, असा वचननामा लिहून दिला होता. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही दारू वितरित करण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्याचप्रकारे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी गावागावात ठराव घेऊन प्रयत्न केल्या जात आहे. निवडणुकीमध्ये उभे होणारे उमेदवार दारूचे व्यसनी नसावे. निवडणुकीदरम्यान गावात दारूचे वाटप होऊ नये. गावात दारूविक्री बंदी टिकून राहावी. दारूच्या नशेत मतदान केल्यास अयोग्य उमेदवार निवडला जातो. अशा व्यक्तीच्या हातात गावाचा कारभार दिल्यास विकासाला ब्रेक लागेल. निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल. यामुळे निवडणूक दारूमुक्त होणे गरजेची आहे. या उद्देशाने मुक्तिपथ गाव संघटना व गावकरी यांच्या पुढाकाराने दारूमुक्त ग्रामपंचायत निवडणूक करण्यासाठी ठराव घेणे सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ गावांनी ठराव घेतला आहे.