दिगांबर जवादे - गडचिरोलीसर्व शिक्षा अभियानांतर्गत चालू आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या एकुण निधीपैकी गडचिरोली जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ९२.३३ टक्के निधी खर्च झाला आहे. निधी खर्च करण्याच्या बाबतीत सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या जिल्ह्याने १०३.३२ टक्के निधी खर्च केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. शिक्षण हे खाते राज्य शासनाच्या अखत्यारीत असले तरी शिक्षणावर बराच खर्च होत असल्याने राज्य शासनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शाळेत पायाभूत सुविधा पुरविणे कधी- कधी अशक्य होत असल्याने तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण देशात सर्व शिक्षा अभियान सुरू केले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारतीचे बांधकाम, शौचालयाचे बांधकाम, शाळेत पाणी पुरवठ्याची व्यवस्था, रॅम, अपंगांना साहित्याचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, शिक्षणासंबंधीत अध्यावत साधन सामुग्री, संगणक उपलब्ध करून दिले जातात. गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यावर्षी ३७ कोटी रूपयांचा आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. एकुण निधीपैकी टप्प्या- टप्प्याने शिक्षण विभागाला निधी प्राप्त झाला. एकुण निधीपैकी ३० सप्टेंबरपर्यंत सुमारे ९२.३३ टक्के निधी गडचिरोली शिक्षण विभागाने खर्च केला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांच्या विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासास फार मोठा हातभार लागला आहे. निधी खर्च करण्याच्या बाबतीत राज्यात सातारा जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. या जिल्ह्याने १०३.३२ टक्के निधी खर्च केला आहे. तर अहमदनगर जिल्ह्याने ९२.८९ टक्के निधी खर्च केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीसुद्धा गडचिरोली जिल्हा प्रशासन सर्व शिक्षा अभियानाचा निधी खर्च करण्यामध्ये चवथ्या क्रमांकावर होता.
सर्व शिक्षा अभियान निधीच्या खर्चात गडचिरोली राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
By admin | Published: November 06, 2014 10:54 PM