‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेला आदिवासी सेवक पुरस्कार गडचिरोली : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ स्वयंसेवी संस्था कुरखेडाला आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासनाने प्रदान केला आहे. यानिमित्त संस्थेचे प्रमुख डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांचा अप्पलवार आय हॉस्पीटल व गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टीन्शर तर्फे १३ एप्रिल रोजी वैभव हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. बी. कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेमंत अप्पलवार, डॉ. अरूण राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. आर. डी. मुनघाटे उपस्थित होते. गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टीन्शर (जीएएमपी) ला धर्मदाय आयुक्त गडचिरोली यांच्या मार्फतीने नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्राचे हस्तांतरण डॉ. गोगुलवार यांच्या हस्ते संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. आर. डी. मुनघाटे व डॉ. सचिव कामडी यांच्याकडे करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सतीश गोगुलवार यांनी आधुनिक जीवनशैली खाद्य संस्कृती ही आरोग्यास घातक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल हे औषधीयुक्त झाडांनी समृद्ध आहे. त्याचा उपयोग होणे आवश्यक आहे. आपल्याच लोकांनी केलेला सत्कार इतर कोणत्याही पारितोषिकापेक्षा श्रेष्ठ आहे. या सत्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. आर. डी. मुनघाटे, डॉ. सचिन कामडी, डॉ. अरूण राठोड, डॉ. अनिल रूडे व डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. हेमंत अप्पलवार, संचालन डॉ. किशोर वैद्य तर आभार डॉ. उनाडकाट यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अद्वय अप्पलवार, डॉ. प्रशांत चलाख, छोटू यादव, नरेंद्र चिंतलवार, विजय चौधरी, रोशन सडमाके, धर्मपाल मेश्राम यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 1:42 AM