लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बांडे नदीपलीकडील कुदरी गावात लसीकरणासाठी गेलेल्या आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या गावातील एका गर्भवती महिलेला खाटेवर दवाखान्यात आणले. विशेष म्हणजे त्या महिलेची नाॅर्मल प्रसूतीही झाली. माता व बाळ सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा अंतर्गत बांडे नदीपलीकडील कुदरी गावात लसीकरणासाठी ८ नाेव्हेंबर राेजी आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू गेली हाेती. दरम्यान, सरिता विनोद नरोटे (२३ वर्षे) या गरोदर मातेला नियाेजित प्रसूती तारखेच्या आधीच प्रसूतीच्या कळा सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. सरिता ही पहिल्या खेपेची गरोदर महिला असल्याने तिला प्रसूतीसाठी त्रास होईल हे गृहीत धरून आरोग्य सेविका दुर्वा यांनी दवाखान्यात भरती होण्यास सांगितले. परंतु मातेनेच दवाखान्यात येण्यास नकार दर्शविला. गर्भवती महिला जोखमीच्या स्थितीत उपचारासाठी जाऊ शकणार नाही हे आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती होते. त्यांनी खूप विनवण्या करूनसुद्धा ती महिला दवाखान्यात येण्यास तयार नव्हती. त्यामुळे आरोग्य चमू उपकेंद्र मवेली येथे परत येऊन प्रसूतीची किट व इमर्जन्सी औषधी नेण्याकरिता आली. त्याचवेळी त्यांनी तोडसाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. राकेश नागोसे यांना दूरध्वनीद्वारे या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा डाॅ. नागोसे हे वेळ न घालविता कुदरी गावाजवळ नदीच्या काठावर येऊन पोहोचले. बांडे नदीमध्ये पाणी असल्याने रुग्णवाहिका पलीकडे जाऊ शकत नाही म्हणून सर्वांनी पायी प्रवास करून कुदरी गाव गाठले. डाॅ. नागोसे यांनी जंगलाच्या वाटेतच गरोदर मातेची आरोग्य तपासणी केली. तेव्हा तिला रक्तस्राव होत असल्याचे समजले. गुंतागुंत वाढू नये म्हणून तिला खाटेवर त्याच स्थितीमधे गावकऱ्यांच्या सहकार्याने नदीच्या काठावर पोहोचविले. नंतर रुग्णवाहिकेने एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. प्रसूतीला वेळ आहे व रक्तस्राव होत असल्याने एटापल्ली येथील डॉक्टरांनी त्या महिलेला अहेरी येथे रेफर केले. अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे मध्यरात्री १:३० वाजता प्रसूती तज्ज्ञांद्वारे सरिताची नॉर्मल प्रसूती करण्यात आली. २ किलो ३०० ग्रॅम वजनाच्या नवजात बालिकेला जन्म दिला.