गडचिरोली : महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून १४ नोव्हेंबर (बालक दिन) ते १९ नोव्हेंबर (जागतिक शौचालय दिन) या कालावधीत आणखी स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फार मोठी तारंबळ उडाली आहे. स्वच्छतेचे महत्व कळावे, त्याचबरोबर रोगांना आळा घालता यावा, यासाठी केंद्र शासनाने २ आॅक्टोबरपासून स्वच्छता अभियान संपूर्ण देशात राबविण्यास सुरूवात केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली. त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांनी स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली गेली. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही दिसून आला.स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. हा टप्पा बालक दिनापासून सुरूवात होऊन जागतिक शौचालय दिनाला संपणार आहे. यामध्ये १४ नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी काढणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, १५ नोव्हेंबर रोजी मुनादीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करणे, १६ नोव्हेंबर रोजी वर्तमान पत्रामध्ये बातमी देणे, शाळेमध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देणे, १७ नोव्हेंबर रोजी खुल्या जागेवर शौचास करण्यास बंदी आणणे, ज्या परिसरात बाहेर शौचास करण्याचे प्रमाण जास्त तिथे जास्त प्रमाणात जनजागृती करणे, यासाठी नागरिक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेणे, १८ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करणे, साफसफाईचे वेळापत्रक तयार करून नागरिकांना साफसफाईचे व आरोग्यविषयक महत्व समजावून सांगणे, १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करून शौचालयाचे व आरोग्याचे महत्व समजावून सांगणे, शौचालय प्रत्येक घरी बांधण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी कार्यक्रम राबविण्याचे सक्त निर्देश प्रत्येक कार्यालयाला तसेच शाळेला देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली आहे. (नगर प्रतिनिधी)
स्वच्छता अभियान पाठ सोडेना
By admin | Published: November 01, 2014 10:53 PM