एफडीसीएमचा मनमानी कारभार : गौण वनोपजाची बेसुमार कत्तलवैरागड : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावलखेडा येथील कक्ष क्रमांक ३०, ३२ या नियत क्षेत्रातील सुमारे २० हेक्टरवरील वृक्षतोड करण्याचे काम मागील आठ दिवसांपासून वन विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यात मोठ्या वृक्षासह महत्त्वाच्या गौण वनोपजाची बेसुमार कत्तल केली जात आहे. या विरोधात सावलखेडाच्या नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एफडीसीएमच्या मनमानी कारभाराविरोधात एल्गार पुकारून वृक्षतोड थांबविली आहे. सावलखेडा उपवनक्षेत्रात वन विकास महामंडळाकडून कक्ष क्रमांक ३०, ३२ बिटात मागील आठ दिवसांपासून वृक्षतोड सुरू होती. ही बाब लक्षात आल्यानंतर सावलखेडातील दीडशे ते दोनशे लोकांना जमाव घटनास्थळावर जाऊन वृक्षतोड करणाऱ्या लोकांना समजावून त्यांना परत पाठविले आणि वृक्षतोड थांबविली. त्यानंतर वन विकास महामंडळाचे अधिकारी गावात आले. त्यांनी वृक्षतोड झालेल्या भागात नव्याने रोपवन तयार करण्यात येईल, अशी माहिती दिली. मात्र गावकऱ्यांनी काहीही ऐकून न घेता वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. बेसुमार अवैधरित्या होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी सावलखेडा येथील गावकऱ्यांनी वनसंरक्षण समिती गठीत करून या समितीत प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य घेतला आहे. वन विकास महामंडळाकडून होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी १५ ते २० नागरिक समुहाने रोज गस्तीवर राहतात. सन २०१५ चा ग्राम वन कायदा रद्द करण्यासाठी सावलखेडावासीयांनी पुढाकार घेतला होता. अखेर सरकारला सदर कायदा रद्द करावा लागला. (वार्ताहर)
सावलखेडावासीयांनी थांबविली वृक्षतोड
By admin | Published: February 10, 2016 1:53 AM