नागरिकांपुढे अडचण : दोन महिन्यांपासूनची स्थिती लोकमत न्यूज नेटवर्क मार्र्कंडादेव : विविध योजनेच्या लाभासाठी तसेच महसूल तसेच इतर विभागाशी संबंधित विविध कामांसाठी तसेच करारनामे, प्रतिज्ञानलेख आदींसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. मात्र चामोर्शी येथील तहसील कार्यालयात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. वारंवार तहसील कार्यालय परिसरात येऊनही नागरिकांना स्टॅम्प पेपर मिळत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. विक्रेत्यांकडून उद्या किंवा परवा या असे नागरिकांना सांगितले जाते. त्यामुळे चामोर्शीच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी याकडे लक्ष देऊन स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक शासकीय तसेच खासगी कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. मात्र चामोर्शी तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याने उद्या १२ वाजेपर्यंत या, अथवा सायंकाळी या असे सांगत वेळ मारून नेत आहेत. संबंधित नागरिक दुसऱ्या दिवशी गेले असता, हेच कारण दिले जात आहे. १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी नागरिकांना १०० रूपये खर्च करून गडचिरोली व अन्य ठिकाणी जावे लागत आहे. गडचिरोली येथील तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्यांकडे मुबलक प्रमाणात स्टॅम्प पेपर उपलब्ध आहेत. मात्र चामोर्शी येथे स्टॅम्प पेपरचा तुटवडा का दाखविला जातो, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. खरीप हंगाम तोंडावर असून शेतकरी कर्ज काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या कामात भिडला आहे. आता काही दिवसात इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनाही विविध शैक्षणिक कामासाठी स्टॅम्प पेपरची गरज भासणार आहे. त्यामुळे तत्काळ स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चामोर्शीत स्टॅम्प पेपरचा तुटवडा
By admin | Published: May 28, 2017 1:17 AM