अशोक नेते यांची माहिती : बूथ सक्षमीकरणातून शेवटच्या माणसापर्यंत जागृती लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशात कार्यविस्तारक योजनेद्वारे पंडित दीनदयाल यांचे विचार, कार्य व पक्षाचे विचार तसेच विकास कामे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणार, अशी माहिती मंगळवारी चामोर्शी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी दिली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे, रामेश्वर सेलुकर, रवी किरण समर्थ, नगरसेवक रमेश भुरसे, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, नामदेव सोनटक्के, प्रकाश अर्जूनवार, पं.स. सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, दिलीप चलाख, मनमोहन बंडावार, जयराम चलाख, विनोद गौरकार, साईनाथ बुरांडे, राजू चुधरी, रेखा डोळस, सुभाष धोटे, विजय हटवार, सुशांत रॉय, माणिक कोहळे आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ‘वन बूथ टेन यूथ’ या माध्यमातून बूथ सक्षमीकरण करून शेवटच्या नागरिकापर्यंत आपण पूर्ण केलेली विकासकामे पोहोचविणार, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्याशिवाय योजनांचा उपयोग होत नाही. त्यामुळे हे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. कार्यविस्तार योजना ही २९ मे ते १२ जून यादरम्यान असून सहा महिने तसेच एक वर्षाकरिता विस्तारकांची नेमणूक व समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये युवक युवती व नागरिकांचा सहभाग असणार आहे, असे खासदार नेते यांनी यावेळी सांगितले. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग व पाच बंधारे आदी विकासकामे मंजूर केली आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणार
By admin | Published: June 08, 2017 1:42 AM