देसाईगंज : दिवसेंदिवस देसाईगंज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघाताचा धाेका वाढला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर परिषदेकडे केली आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
शाळा जीर्णावस्थेत
सिरोंचा : दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
डिझेलसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या
धानोरा : शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी डिझेलवर चालणारे इंजीन पाच वर्षांपूर्वीपर्यंत अनुदानावर वाटप करण्यात आले. मात्र, सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांना या इंजीनचा वापर करताना अडचण निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.
विद्युत केंद्रांअभावी पुरवठ्याची समस्या
सिरोंचा : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्र निर्मितीची मागणी आहे. वीज समस्या साेडविण्यासाठी केंद्रांची निर्मिती करावी, अशी मागणी हाेत आहे.
सौरऊर्जेवरील अनेक नळ योजना बंद
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युतची सुविधा नाही. तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या गावांमध्ये सौर ऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दुर्लक्षामुळे अनेक योजनांमध्ये बिघाड आला आहे.
अरूंद पुलाचा प्रश्न कायम
गडचिरोली : ब्रिटीश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरूंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. ठेंगणे व अरूंद पूल हे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत.
दत्तमंदिर दुर्लक्षित
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे दत्ताचे आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मंदिराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. वर्षभर येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामानाने मंदिरात साेयीसुविधांचा अभाव आहे.
कलावंतांना अल्प मानधन
कुरूड : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. झाडीपट्टी रंगभूमीवर रसिकांचे मनोरंजन करणाºया कित्येक कलावंतापुढे वृध्दापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐेरणीवर आहे. शासनाने कलावंतांचे मानधन वाढवावे, अशी मागणी हाेत आहे.
वाहतुकीस येताहे अडसर
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरूस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पशु विभागातील पदे रिक्त
एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे निर्माण होत आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे पशु विभागातील रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी हाेत आहे.