आसरअल्ली : येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या छिद्रामधून पाणी गळत असून यामुळे जवळच असलेल्या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. आसरअल्ली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा एसटी बसस्थानकाला अगदी लागून आहे. कित्येक वर्षांपूर्वी या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला मागील काही दिवसांपासून छिद्र पडले आहे. या छिद्रातून नियमितपणे पाणी गळत राहते. मागील काही दिवसांपासून या छिद्राचा आकार वाढत चालला आहे. त्यामुळे पाणी गळण्याचे प्रमाणही वाढत आहे. गळलेल्या पाण्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलामुळे दुर्गंधी निर्माण झाली असून याचा त्रास विद्यार्थी व सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. सतत ओलाव्यामुळे जिल्हा परिषद शाळेलाही धोका निर्माण झाला आहे. याच परिसरात विद्युत रोहित्र आहे. सदर रोहित्रसुध्दा विद्यार्थी व प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत विभागानेही सदर रोहित्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. बऱ्याच वेळा डीपीची दारे उघडीच राहतात. एखादा विद्यार्थी चुकून डीपीला हात लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी पुरवठा विभागाने पाण्याची नवीन टाकी बांधावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दहागावकर यांना विचारणा केली असता, रोहित्र किंवा पाण्याच्या टाकीबाबत तक्रार केली नसल्याचे लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
फुटक्या टाकीने शाळेला धोका
By admin | Published: August 11, 2015 2:01 AM