नऊ प्राथमिक शाळांमध्ये प्रयोग : २०१६-१७ पासून नर्सरीचे वर्ग होणार सुरूगडचिरोली : आधुनिक युगात वाढत्या स्पर्धेत खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी भरमसाठ शुल्कवाढ केल्यामुळे सर्वसामान्य पालकांचे पाल्य इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ शकत नाही. सर्वसामान्य गरीब पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, या हेतुने गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने पुढील २०१६-१७ वर्षांपासून नऊ प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे नर्सरी वर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसा निर्णय पालिका पदाधिकारी व प्रशासनाने घेतला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. गडचिरोली नगर पालिकेंतर्गत शहरात एकूण १० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. यापैकी केवळ रामनगर येथील जवाहरलाल नेहरू न.प. प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. या शाळेने आयएसओ नामांकन प्राप्त करून संपूर्ण देशात नाव लौकीक मिळविला आहे. शहरात शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर, हमाल आदीसह विविध वार्डात सर्वसामान्य कुटुंबांचे वास्तव्य आहे. या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न फार कमी असल्याने या कुटुंबातील मुल, मुली बाल विकास प्रकल्प विभागाच्या अंगणवाडी केंद्रात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहे. मात्र त्यांना नाममात्रच शिक्षण मिळत आहे. अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या हेतुने पालिकेने उर्वरित नऊ न.प. प्राथमिक शाळेत नर्सरी वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पालिका देणार इंग्रजी शिक्षणाचे धडे
By admin | Published: February 14, 2016 1:24 AM