कुरखेडा : तालुक्यात एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांचा शालेय विद्यार्थिनींना मोठा फटका बसत आहे. अनेकवेळा बस वेळेत न येत असल्याने बसस्थानक परिसरात तासन्तास उपाशी या विद्यार्थिनींना थांबावे लागत आहे. तालुका मुख्यालयात तब्बल १२०० विद्यार्थी दररोज ये-जा करतात. मालेवाडा परिसरातील धनेगाव, येंगलखेडा, शिवणी, महाजनटोला, चिचटोला येथील सकाळपाळीतील विद्यार्थी सकाळी ७ वाजता मालेवाडा-गडचिरोली बसने कुरखेडा येथे येतात. त्यांची शाळेची सुटी ११ ते ११.३० दरम्यान होते. त्यांना परतीकरिता गडचिरोली-मालेवाडा ही १२.१५ ची बसफेरी आहे. मात्र सदर फेरी कधीच वेळेवर येत नाही. अनेकदा ती रद्द सुध्दा करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकावरच दुपारी ३ वाजेपर्यंत दुसऱ्या बसफेरीची वाट पाहत उपाशी थांबावे लागते. तसेच रामगड, पुराडा, अंतरगाव, भटेगाव, कुंभीटोला, हेटीनगर, परिसरातील दुपारपाळीतले विद्यार्थी सायंकाळी परतीचा प्रवास गडचिरोली-कोटगुल या बसफेरीने करतात. ही बस कुरखेडावरून सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत जाते. मात्र ही बसफेरी सुध्दा अनेकदा अनियमित आहे. या मार्गावरील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारला सुध्दा अचानक ही बसफेरी रद्द करण्यात आल्याने या मार्गावरील गावांमधील ३५ ते ४० विद्यार्थी रात्री ७.३० वाजेपर्यंत येथे अडकून पडले होते. याबाबत माहिती मिळताच कुरखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे यांनी गडचिरोलीचे बसस्थानक प्रमुख राठोड तसेच आगार व्यवस्थापक बावणे यांना संपर्क केला व तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर कुरखेडा येथील मुक्कामी असलेली अंतरगाव बसफेरीने या मुलांना त्यांच्या गावी सोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
अनियमित बसफेऱ्यांचा शालेय विद्यार्थिनींना फटका
By admin | Published: January 13, 2017 12:45 AM