दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्याने युक्रेनमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन देशात गेलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील तीनही विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्या पालकांनी दिली आहे. मात्र युद्ध सुरू असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. गडचिराेली येथील दिव्यानी सुरेश बांबाेळकर, स्मृती रमेश साेनटक्के, मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर बाजार (गाेमणी) येथील तनुश्री रामक्रिष्ण कर या तीन विद्यार्थिनी युक्रेन देशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेल्या आहेत. यातील दिव्यानी व स्मृती या दाेघी युक्रेनची राजधानी किव्हपासून २५० किमी अंतरावर असलेल्या व्हिनित्सिया येथील व्हिनित्सिया नॅशनल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत, तर तनुश्री ही उझाेराेड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे. दिव्यानी एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला आहे. तर स्मृती व तनुश्री या पहिल्या वर्षाला आहेत. दिव्यानी ही आपल्या मैत्रिणींसाेबत व्हिनित्सिया शहरातील भाड्याच्या खाेलीत राहते, तर स्मृती वसतिगृहात राहते. रशिया व युक्रेनच्या सीमेलगत युद्ध सुरू असले तरी तीनही विद्यार्थिनी राहत असलेली शहरे यापासून बरीच लांब आहेत. त्यामुळे त्या सुरक्षित आहेत. मात्र दहशतीचे वातावरण कायम आहे. पाेलीस प्रशासनामार्फत वेळाेवेळी सायरन वाजवून नागरिकांना सावध केले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आवश्यक तेवढे सामान खरेदी करावे, अशा सूचना युक्रेन प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थिनींनी साहित्य खरेदी केले आहे, अशी माहिती पालक व स्मृती साेनटक्के हिने लाेकमतशी बाेलताना दिली.
लवकरच परतणार हाेत्या - युद्धजन्य परिस्थिती असल्याने दिव्यानी व स्मृतीने भारतात परत येण्याचे प्रयत्न केले हाेते. दिव्यानी ही २८ फेब्रुवारी राेजी तर स्मृती ही ४ मार्च राेजी परतणार हाेती. मात्र आता विमानसेवा बंद असल्याने भारतात परतण्याचा मार्ग तूर्तास बंद झाला आहे. - तनुश्री ही नुकतीच १६ फेब्रुवारी राेजी तर स्मृती ६ डिसेंबर राेजी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेली.
भारतीय दूतावास संपर्कातयुक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भारतीय दूतावास संपर्कात आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत व युद्धाची अपडेट माहिती दूतावासामार्फत दिली जात आहे, अशी माहिती स्मृती साेनटक्के हिने लाेकमतशी बाेलताना दिली.
नातेवाईकांनी पाेलीस ठाण्याशी संपर्क साधावा
गडचिराेली : युक्रेनमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जेणेकरुन अडकलेल्या नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल. नातेवाईकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे किंवा ०७१३२-२२३१४९, ०७१३२-२२३१४२ जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे किंवा ९४०३८०१३२२ या क्रमांकावर संपर्क करुन कळवावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.