लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत. मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले- नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची व्यवस्था प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केली आहे. - अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गाेलाकर्जी ४०, तिमरम ४, माेदुमगडगू ४, निमलगुडम १२, रेगुलवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच सिराेंचा तालुक्यातील मद्दीकुंठा ३२ व सूर्यारावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
१५ दिवसात पाच जणांचा पुरामुळे बळी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा येथील राजकुमार एकनाथ राउत हा ४ जुलै राेजी काेलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला असता ताे वाहून गेला. अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावर जितेंद्र दाेडके हा वीज कर्मचारी ९ जुलै राेजी वाहून गेला. १० जुलैच्या रात्री याच पेरमिली नाल्यावर एक ट्रक वाहून गेला. या ट्रकमध्ये अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथील सीताराम बिच्छु तलांडे, सम्मी सीताराम तलांडे, भामरागड तालुक्यातील माेकाेला येथील पुष्पा नामदेव गावडे ही १४ वर्षाच्या मुलीचे मृतदेह आढळले.
भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार साेमवार ते बुधवारपर्यंत वज्राघात, अतिवृष्टी हाेण्याची शक्यता आहे. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी काेणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. नदी नाल्याजवळ सेल्फी काढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. - संजय मीना, जिल्हाधिकारी, गडचिराेली
प्रशासन अलर्टपुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेउन प्रशासन अलर्ट झाले आहे. मुख्यालयी राहण्याच्या सूचना सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणी दाेन्ही बाजुला पाेलीस तैनात केले जातील.
या धरणांचे पाणी साेडले वैनगंगा नदीचे मध्यप्रदेशातील संजय सराेवराचे सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. गाेसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ५ दरवाजे, चिचडाेह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडले आहेत.वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच १३ दरवाजे उघडले आहेत. निम्म वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ७ दरवाजे उघडले आहेत.गाेदावरील नदीवरील मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ६५ दरवाजे उघडले आहेत.भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकाेटा, पामुलगाैतम या नद्यासुद्धा ओसांडून वाहत आहेत.