गडचिराेली : बाराही तालुके मिळून जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या जवळपास १ हजार ४६४ शाळा असून, यामध्ये प्राथमिक शिक्षकांची एकूण ४ हजार ३३१ पदे मंजूर आहेत. यापैकी ३ हजार ८२५ पदे भरण्यात आली असून, बऱ्याच दिवसांपासून ५०६ पदे रिक्त आहेत.
गडचिराेली जिल्ह्यातील गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, देसाईगंज हे चार तालुके साेडले तर इतर आठ तालुक्यातील शिक्षणाची भिस्त जि. प. शाळांवरच आहे; मात्र अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वाणवा असल्याने गुणवत्तेवर परिणाम हाेत आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या पुणे येथील कार्यालयाकडून जि. प. च्या प्राथमिक शाळांची संच मान्यता केली जाते; मात्र गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून संच मान्यता झाली नाही. परिणामी, जि. प. शिक्षण विभागाला शिक्षक संख्येचे गणित याेग्यरीत्या जुळविता आले नाही. रिक्त पदे भरणे, शिक्षकांचे समायोजन आदी कार्यवाही थंड बस्त्यात आहे.