लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत.
तत्कालीन सरकारने 'गाव तिथे शाळा' हे धोरण राबविल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली. शहरालगतच्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली. दरम्यान जिल्हयात १० पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास २७८ आहे. शासनाच्या मान्यतेनूसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
यापूर्वी २० पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जि.प.च्या शाळांमध्ये एका कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते. मात्र निवडणुकीची आचारसंहिता ही प्रक्रिया थांबली होती.
या तालुक्यातील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकजिल्ह्यातील अहेरी उपविभागातील तसेच कोरची व धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात जि.प. शाळांची पटसंख्या कमी झाली असून याच तालुक्यांमध्ये १० च्या आत पटसंख्या असलेल्या अडीचशेपेक्षा अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक मानधन तत्त्वावर देण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड व सिरोंचा या पाच तालुक्यात तसेच उत्तर भागातील कोरची आणि मध्य भागातील धानोरा तालुक्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पं.स. स्तरावरून अर्ज जिल्ह्याच्या सात पंचायत समिती स्तरावरून कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. सदर अर्ज आता पं.स.कडून जि.प.ला प्राप्त झाले आहे.
कर्मचारी लागले कामातविधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाचे कर्मचारी सदर कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेच्या कामात लागले आहेत. सोमवार किंवा मंगळवारपासून प्राप्त अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे.
"आधी २० च्या आतील पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक देण्यात येणार होते. मात्र शासनाच्या नव्या पत्रानुसार आता १० च्या आतील पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळतील." - विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) गड.