दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरातील आशीर्वाद नगरातील सुबाेध जनबंधूची हत्या करणारे आराेपी हे घराच्या मागच्या दरवाजातून शिरले हाेते. मागच्या दरवाजाची कहाणी जनबंधू कुटुंबाशी अत्यंत जवळीक असलेल्यांनाच माहीत असल्याची माहिती जनबंधू कुटुंबीयांना पाेलिसांनी दिली. त्यानुसार गडचिराेली पाेलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी तपासाची सूत्रे फिरवल्याने केवळ पाच दिवसांच्या कालावधीत आराेपींना अटक झाली.
सुबाेधची हत्या झाल्याची माहिती मिळताच गडचिराेलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्यासह गडचिराेली पाेलीस घटनास्थळी पाेहाेचले. घराचा दरवाजा किंवा खिडकीची काेणतीही ताेडफाेड न करताच आराेपी मागच्या दरवाजाने घरात शिरले हाेते. मागच्या दरवाजाला लाथ मारल्यानंतर सहज निघत हाेता. ही बाब जनबंधू कुटुंबीयांशी अत्यंत जवळीक असलेल्या व्यक्तींनाच माहीत हाेती, अशी माहिती जनबंधू कुटुंबांनी पाेलिसांना दिली. यावरून जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख, गडचिराेलीचे एसडीपीओ प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी त्याच दिवशीपासून गाेपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. साेनू मेश्रामच्या आई-वडिलांनी साेनूला सुबाेधच्या अंत्यविधीसाठी येण्यास सांगितले. मात्र ताे आला नाही. काही वेळानंतर ताे स्वत:च आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच परत गेला. यावरून साेनूबाबतचा संशय पाेलिसांना बळावला. पाेलिसांनी साेनूबाबत अधिकची माहिती काढली असता, ताे व्यसनांच्या आहारी गेलेला व गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती मिळाली. तसेच साेनू व दुसरा आराेपी सुमित मेश्राम हे दाेघेही छत्तीसगड राज्यात पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पाेलिसांचा संशय पक्का झाला व त्यांनी साेनू व सुमितला ताब्यात घेतले. सुरुवातीला गुन्हा कबूल केला नाही. मात्र पाेलिसी खाक्या दाखवताच सर्वप्रथम साेनूने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सुमितनेही गुन्हा कबूल केला. या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
बेशुध्द पाडायचे हाेते, मात्र गांजाच्या नशेने पडला विसरसाेनू व सुमित हे दाेघेही गांजाचे शाैकीन आहेत. मृतक सुबाेधला बेशुध्द करून त्याच्या घरातील ऐवजाची चाेरी करायची हाेती. त्यासाठी ते माेठ्या प्रमाणात गांजा पिऊन देउळगाव येथून रात्री २ वाजता दुचाकीने गडचिराेली येथे पाेहाेचले. मात्र गांजाच्या नशेत असलेल्या साेनू व सुमितला याचा विसर पडला. दाेघांनीही केबलने सुबाेधचे हात बांधले. त्याला बेशुध्द करण्यासाठी प्लास्टिकची पिशवी डाेक्याभाेवती गुंडाळली व दाेराने घट्ट बांधली. मात्र श्वास गुदमरल्याने सुबाेधचा मृत्यू झाला.
आराेपींकडून दीड लाखाचा ऐवज जप्त
सुबाेधचे मारेकरी सुमित मेश्राम व साेनू मेश्राम यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. पाेलीस काेठडीदरम्यान गडचिराेली पाेलिसांनी आराेपींकडून नेकलेस, झुमके, बिऱ्या असे १ लाख ९ हजार रुपये किमतीचे साेने, १० हजार रुपये किमतीचा माेबाईल तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली ३० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे.
ही कारवाई ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, एलसीबीचे पाेलीस निरीक्षक गाैरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय चेतनसिंग चव्हाण, पूनम गाेऱ्हे, ओमदास म्हशाखेत्री, हेड कान्स्टेबल प्रमाेद वाळके, खेमराज नवघरे, खुशाल काेसनकर, ओम पवार, चंद्रभान मडावी, सकील सय्यद, नाईक पाेलीस शिपाई धनंजय चाैधरी, स्वप्निल कुडावले, परशुराम हलामी, सुजाता ठाेंबरे, पाेलीस शिपाई कलाम पठाण, बारगजे यांनी केली.