लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाने दि. २९ सप्टेंबर २०२१ राेजी काढलेल्या अधिसूचनेमुळे हिवताप विभागात कार्यरत हंगामी फवारणी तसेच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे आराेग्य सेवक बनण्याचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, या मागणीसाठी सदर कर्मचारी संघर्ष करीत आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे. जिल्ह्यात राज्यातील ७५ टक्के मलेरियाचा प्रादुर्भाव असूनही नियमित ऑर्डर निघत नाहीत. २०१६ साली नियुक्त केलेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचे ९० दिवस काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मग १८० दिवस पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष वाट पहावी लागेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील अनेक क्षेत्र कर्मचारी आराेग्य सेवकाच्या पदासाठी पात्र ठरू शकतात. मात्र ती अन्यायकारक अधिसूचना रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.
बारावी विज्ञान पासची जाचक अट - बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट ‘क’ चा फार्म भरण्यासाठी आत्ता बारावी सायन्स पासची अट लागू झालेली आहे. आर्ट फॅकल्टी च्या बहुतांश मुलांसाठी वेळेवर बारावी सायन्स ही अट पूर्ण करणे अशक्य आहे. त्याशिवाय सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा अनिवार्य करण्यात आला आहे. बहुतांश मुलांना सायन्स नसल्यामुळे ते करणे सुद्धा अशक्य आहे. म्हणून ५० टक्के राखीव कोटा पूर्ववत करून, बारावी पास कोणत्याही शाखेतून करावे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पास डिप्लोमा ही अट रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली द्वारा करण्यात आलेली आहे.- मुंबई येथे आंदाेलन केल्यानंतर कर्मचारी गडचिराेली येथे पाेहाेचले. गडचिराेली येथील पत्रकार भवनात सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेत यापुढे लढा कसा द्यायचा, याचे नियाेजन करण्यात आले. सभेला जिल्हाभरातील क्षेत्र कर्मचारी उपस्थित हाेते.