गडचिरोली : जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून पारा चांगलाच खाली आला आहे. मंगळवारी ७.४ तर बुधवारी ८.४ अंश तापमानाची नोंद झाली. दोन्ही दिवसांतील हे तापमान विदर्भात सर्वात कमी असल्याचे नोंदविल्या गेले.
आकाश निरभ्र होऊन हवा मोकळी वाहत असल्याने गारवा अधिक जाणवत आहे. यामुळे गडचिरोलीकरांना दिवसाही गरम कपड्यांमध्ये राहावे लागत आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातही लोक रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून ऊब मिळवत आहेत. ही थंडी रब्बी हंगामातील बहुतांश पिकांसाठी फायदेशीर असली तरी उघड्यावर राहणाऱ्या गुरांसाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने अजून चार दिवस हा गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
विदर्भातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
गडचिरोली - ८.४
नागपूर - ८.५
अमरावती - ८.९
गोंदिया - ९.०
वर्धा - ९.४
यवतमाळ - १०.०
चंद्रपूर - १०.२
अकोला - ११.३
बुलडाणा - ११.६
वाशिम - १२.५