गाेपाल लाजूरकर, गडचिराेली : येथील उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने यांच्या शासकीय बंगल्यावर जिल्हा पोलिस दलातील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, १ सप्टेंबर राेजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
ज्ञानेश्वर बालाजी केंद्रे (३०) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस जवानाचे नाव आहे. ज्ञानेश्वर केंद्रे हे मूळचे नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील आहेत. त्यांची नेमणूक अहेरी प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात हाेती. अहेरीचे उपविभागीय पाेलिस अधिकारी आदित्य जीवने यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक म्हणून त्यांना तैनात करण्यात आले हाेते. नेहमीप्रमाणे ते शनिवारी आपल्या कर्तव्यावर गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास निवासस्थानातील वाॅर्डरुममधील सिलिंग फॅनला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. पहाटे ४ वाजता त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर केंद्रे हे अविवाहित असून ते आपल्या आईवडिलांसह अहेरी येथे वास्तव्यास हाेते. काही दिवसांपासून ते तणावात हाेते, अशी माहिती पाेलिसांनी दिली आहे.