गडचिराेली : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिसेवडधा नजीकच्या खैरीटाेला येथे १७ ऑगस्ट राेजी छापा मारून अवैध माेहसडवा, दारूसह एकूण ८ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील तीन आराेपी फरार आहेत.
आरोपी इसाेक मनुजी तुलाव, अशाेक मनुजी तुलावी व नरेश कुमरे, तिघेही राहणार खैरीटाेला ता.आरमाेरी यांच्यावर धानाेरा पाेलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या आदेशान्वये पिसेवडधा परिसरात दारू पकडण्यासाठी गस्त सुरू हाेती. दरम्यान, खैरीटाेला गावानजीकच्या जंगल परिसरात माेहफुलाची दारू गाळल्या जात हाेती. गस्तीवरच्या पाेलिसांनी पाेलीस पाटील व तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन संबंधित ठिकाणी धाड टाकण्यासाठी गेले असता, तेथून दारू विक्रेते पसार झाले. पाेलिसांनी घटनास्थळावरून माेठ्या प्रमाणात दारू, सडवा व दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे दादाजी करकाडे, नीलकंठ पेंदाम, शुक्राचारी गवई, मंगेश राऊत, सुनील पुट्टावार, पुष्पा कन्नाके, शेषराज नैताम आदींनी केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
बाॅक्स...
असा सापडला दारूसाठा
७ लाख ५० हजार रुपये किमतीचे प्लास्टीकचे २२ ड्रम व गुळाचा सडवा, तसेच ३६ हजार रुपये किमतीचे प्लास्टीक कॅन, १८० लीटर गूळ व माेहफूल दारू जप्त करण्यात आली. ३३ हजार १०० रुपये किमतीचे २२ प्लास्टीक ड्रम, वापरलेला माेहसडवा आणि १० हजार रुपये किमतीचे चार लाेखंडी ड्रम, चार माेठ्या जर्मनी किटल्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्या.