दिगांबर जवादे
गडचिराेली : ज्यांचे पालनपोषण करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. ते म्हातारपणाची काठी बनून साथ देतील, एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून बाळगली हाेती. मात्र, म्हातारपणात त्यांनी घराबाहेर काढले. थकलेल्या शरीरात आता काम करण्याचे त्राण राहिले नाही. त्यामुळे स्वत: कमावून जगणे कठीण झाले आहे. कुठे जावे अशा विवंचनेत असताना त्यांना काेणीतरी वृद्धाश्रमाचा पत्ता सांगतात. एखाद्याच्या मदतीने ते वृद्धाश्रम गाठतात. वृद्धाश्रमात मिळणाऱ्या सोयींमुळे त्यांच्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण केली व दिवाळीचा आनंद त्यांनाही लुटता आला. ही स्थिती गडचिराेली येथील वेदांती वृद्धाश्रमात राहणाऱ्या महिलांची.
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण. हा सण प्रत्येकालाच आपल्या कुटुंबासाेबत साजरा करावासा वाटताे. प्रत्येक कुटुंब प्रमुख आपल्या शक्तीनिशी कुटुंबासाठी काहीना काही नवीन खरेदी करून आपल्या कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरा करण्याचा प्रयत्न करतात. बाजारपेठेला तर दिवाळीच्या सणाचे महिनाभरापूर्वीच वेध लागतात. या सणानिमित्त विविध वस्तूंची खरेदी हाेत असल्याने कारगीरही या सणाची आतूरतेने वाट पाहत राहतात. अशा या आनंदाच्या वातावरणात निराधारांचे जीवन जगणाऱ्या महिलांची दिवाळी कशी असेल बर, असा प्रश्न सहज पडतो.
‘लाेकमत’ने वेदांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या गडचिराेली येथील वेदांती वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील महिलांशी चर्चा केली. त्यांनी रक्ताच्या नात्यांनी घराबाहेर काढल्याचे अतिव दुख व्यक्त केल. मात्र, वृद्धाश्रमाने सहारा दिल्याने आता जगण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळे आमची दिवाळी आनंदात जातेय, अशी भावना वृद्ध महिलांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केली.
आता घराकडे परतायचे नाही
वृद्धाश्रमात राहणाऱ्या काही महिलांना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी नाही. त्यामुळे पती मरण पावताचा त्या निराधार झाल्या. जवळच्या एखाद्या नातेवाईकाने त्यांचा काही दिवस सांभाळ केला. मात्र, काही दिवसांतच घराबाहेर काढले. काहींना तर मुलगा, मुलगी आहे. मात्र, ते वृद्ध महिलांचा सांभाळ करण्यास तयार नाहीत. अशातच वृद्धाश्रमात चांगल्या साेयीसुविधा मिळतात. त्यामुळे आता घराकडे परतायचे नाही. येथून अंत्यविधी निघेल, अशी प्रतिक्रिया जड अंतकरणाने वृद्ध महिलांनी ‘लाेकमत’शी बोलताना व्यक्त केली.
या मिळतात सुविधा?
सकाळी चहा व बिस्कीट, सकाळी ११ वाजता जेवण, दुपारी २ वाजता चहा व बिस्कीट तसेच रात्री जेवण अशी दिनचर्या जेवणाची आहे. २५ वृद्ध महिलांच्या सेवेसाठी १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात परिचारिकांचाही समावेश आहे. त्यांच्या आराेग्याची नियमित तपासणी केली जाते. साबण, पावडर व इतर जीवनावश्यक वस्तू वृद्धाश्रमामार्फतच दिल्या जातात. त्यामुळे त्या घरच्यापेक्षाही आंनदी व सुखी असल्याची भावना व्यक्त केली.
वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणे हे प्रत्येक मुलाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, समाज बदलत चालला आहे. वृद्धांना घराबाहेर काढले जाते. अशावेळी कुठे निवारा मिळेल या चिंतेने वृद्ध नागरिक हाय टाकलेला असताे. त्यांना आधार मिळावा, याच उद्देशाने वृद्धाश्रम चालविले जाते.
- मिलिंद डाेंगरे, संचालक, वेदांती वृद्धाश्रम, गडचिराेली