या कार्यक्रमानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या जिल्ह्यातील आयएएस व आयपीएस निर्माण करण्यासाठी अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्राचेही काम सुरू करणार असल्याचे सांगितले.
विद्यापीठातील दिवसभराच्या कार्यक्रमात गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित होते. त्याचा आवर्जून उल्लेख करीत सामंत यांनी आमदार महोदयांनी कायमच माझ्यासोबत राहावे, असे म्हटले. दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे त्यांच्या या वाक्यावर चांगलाच हशा पिकला.
सर्व वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव
गडचिरोलीतील शासकीय विज्ञान महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वसतिगृहाला ‘मातोश्री’ हे नाव देण्याचा प्रस्ताव आला. त्यावरून राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांच्या शासकीय वसतिगृहांचे मातोश्री असे नामकरण करण्याचा निर्णय आपण घेत असल्याचे या वेळी सामंत यांनी जाहीर केले. तसा जीआरसुद्धा काढणार असल्याचे ते म्हणाले.
(बॉक्स)
जे बोललो ते करून दाखवत आहे
पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, मी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात विद्यापीठात आलो असताना जे बोललो होतो त्या ४ गोष्टीतील ३ करून दाखविल्या. त्यात विद्यापीठाला १२-ब चा दर्जा मिळाला, डाटा सेंटर झाले, मॉडेल कॉलेजचे भूमिपूजनही केले तर आता विद्यापीठास वन आणि आदिवासीबहुल विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. लवकरच हे कामही होईल, असा विश्वास त्यांनी दिला.
जनसंपर्क अधिकाऱ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
विद्यापीठाला जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) हे पद मंजूर असताना आणि त्या पदासाठी अर्ज येऊन त्यांची परीक्षाही झाली असताना दोन वर्षांपासून नियुक्तीच झाली नाही. ही बाब पुन्हा एकदा सामंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी लगेच उपस्थित उच्च व तंत्रशिक्षण संचालकांना याबाबत जाब विचारला. मात्र ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. हे पद तातडीने भरा, माझ्या स्तरावर काही अडचण असेल तर लगेच सांगा, पण विलंब करू नका, असे निर्देश सामंत यांनी दिले.