धानोरा : नागरिकांच्या सुविधेकरिता तहसील कार्यालयाच्या आवारात बांधलेल्या सेतू सुविधा केंद्राची इमारत देखभाल अभावी धूळखात असून निरूपयोगी ठरत आहे.
नागरिकांना तहसील कार्यालयामार्फत काढण्यात येणारे जातीचे, रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, सालवंशी, शिधापत्रिका व इतर कामाकरिता इतरत्र न भटकता एकाच ठिकाणाहून कामे व्हावी, याकरिता शासनाने सेतू केंद्र सुरू केले. हे केंद्र पूर्वी तहसील कार्यालय मधील एका खोलीत सुरू होते. परंतु नागरिकांना विविध कामाकरिता सुविधा व्हावी, याकरिता शासनाने सुविधायुक्त सेतू सुविधा केंद्रासाठी इमारत बांधून दिली. परंतु तिथे सेतू केंद्र सुरू होण्याआधी ऑनलाईन सेंटरमधून विविध कामे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सदर इमारत ही धूळखात पडली आहे. या इमारतीमध्ये बांधकाम ठेकेदाराने सिमेंट व इतर बांधकाम साहित्य भरून ठेवले होते. त्यामुळे तेथे सर्वत्र सिमेंट व कचरा पसरला आहे. तसेच दरवाजा तुटला आहे. इमारतीचा मुख्य दरवाजा खुला असल्याने गैरवापर होण्याची शक्यता आहे. इमारतीच्या सभोवताली कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे सदर इमारतीची स्वच्छता करून तिचा उपयोग नागरिकांना व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.