गडचिराेली : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चामाेर्शी तालुक्याच्या विष्णूपूर जंगल परिसरात छापा मारून माेहफुलाची दारू, सडवा मिळून एकूण ७ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी एका महिला आराेपीसह सहा आराेपी फरार झाले आहेत.
फरार आराेपींमध्ये कालाचंद विजय कीर्तनिया, कमल वासुदेव बिश्वास, विजय रमेन बिश्वास, जयंत माखन हलदर, मुकेश निदूर हलदर तसेच हाशी निरपीन शहा सर्व रा.विष्णूपूर ता.चामाेर्शी आदींचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस पथक चामाेर्शी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत हाेते. दरम्यान विष्णूपूर गावाच्या परिसरात शेततळ्याच्या बाजूला गुळाच्या दारूची हातभट्टी लावण्यासाठी माेठ्या प्रमाणात सडवा टाकून साहित्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पाेलीस पथकाला मिळाली. पाेलिसांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली असता, माेहफुल दारू, सडवा व दारू निर्मितीचे साहित्य आढळून आले.
या ठिकाणी ६ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३२ प्लास्टिक ड्रम तसेच ६ हजार ४०० लीटर गुळाचा सडवा आढळून आला. याशिवाय ३२ हजार रुपये किमतीची ३२ ड्रम गुळाची दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारा गुळाचा सडवा तसेच चार हजार रुपये किमतीचे चार लाेखंडी ड्रम सापडले. याच परिसरात आणखी दुसरी कारवाई केली. त्यात घराशेजारी असलेल्या शेतामध्ये एक महिला गुळ व माेहाची दारू विक्री करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. तिथे छापा टाकून १० हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू, ८० हजार रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम तसेच चार हजार रुपये किमतीचे ड्रम आढळले. या दाेन्ही कारवाया मिळून ७ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.