लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली- नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी (दि.२२) गडचिरोली पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत 16 नक्षलींना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता 31 वर पोहोचला आहे. छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदी परिसरात शोधमोहीम सुरूच असून ४ मृतदेह अजून मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.छत्तीसगड सीमेजवळील ताडगावजवळच्या कसनासूर जंगलात रविवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे चकमक उडाली होती. ३५ ते ४० च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांवर पोलीस भारी पडले आणि १६ जण त्याच परिसरात ठार झाले तर बाकी पळून गेले. पण त्यातील बरेच जण जखमी झाले होते.जंगलात पळून गेल्यास पोलीस हुडकुन काढतील म्हणून त्यांनी इंद्रावती नदी पार करत छत्तीसगडच्या सीमेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी अवस्थेत नदी पार करणे अनेकांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना पाण्यातच प्राण सोडावे लागले.सोमवारी संध्याकाळी इंद्रावती नदीत काही मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पण रात्री अंधारात शोध घेणे कठीण झाल्याने आज (दि. २४) पहाटेपासुन स्थानिक नावाड्यांच्या मदतीने शोधमोहिम सुरू करण्यात आली. त्यात सकाळी १० वाजेपर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुरक्षेत सी-६० पथकाचे जवान शोधमोहीम राबवत आहेत.तो संपूर्ण परिसर सुरक्षा दलाने घेरलेला आहे. तिकडे कोणालाही प्रवेश नाही. इंद्रावती नदीच्या दोन्ही बाजूने शोध सुरू आहे. छत्तीसगड पोलीसही या कामी मदत करीत आहेत. मृतदेहांसह त्यांच्यासोबत असलेल्या शस्त्रांचाही नदीच्या तळात शोध सुरू आहे.
रविवारच्या चकमकीतील मृत नक्षलवाद्यांचा आकडा 31 वर, इंद्रावती नदीत आतापर्यंत आढळले 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:04 AM
नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी (दि.२२) गडचिरोली पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत १६ नक्षलींना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता २३ वर पोहोचला आहे.
ठळक मुद्देजखमी अवस्थेत नदीत मारल्या उड्याअजून चार मृतदेह असण्याची शक्यताशोधमोहीम सुरू