गडचिरोली/नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात गुरुवारी सुरक्षा दल व नक्षल्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कारवाईनंतर अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यापैकी अनेकजण जखमी झाल्याचा अंदाज दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी वर्तविला.
सीमाभागात प्लॅटून क्र. १६ व इंद्रावती एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
११२ नक्षलवादी ठारछत्तीसगडमध्ये यंदाच्या वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ११२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गेल्या १० मे रोजी बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता.