लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्त्रिच्या गर्भावस्थेचा कालावधी ३७ आठवड्यांचा मानला जातो. त्यानंतर तिची प्रसूती होणे अपेक्षित असते. परंतु, काही कारणांनी या कालावधीपूर्वी प्रसूती होते. यालाच अकाली प्रसूत होणे असे म्हटले जाते. जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत जवळपास सहा ते सात टक्के महिलांची वेळेआधीच प्रसूती झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे वेळेआधीची प्रसूती आर्थिकदृष्ट्या खासगी रुग्णालयात परवडत नाही.
वेळेआधीच प्रसूती झाल्यानंतर जन्मलेल्या बालकांना काही दिवस किंवा काही आठवडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. अशा बालकांची रोग प्रतिकारकशक्ती कमी असते. तसेच शारीरिक व मानसिक विकास पूर्ण झाला नसतो. अशा बालकांमध्ये मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत या अवयवांचे विकार जडतात.
वेळेआधीच डिलिव्हरीची कारणे ?स्त्री तसेच पुरुष बीजांमधील दोष, गर्भारपणातील समस्यांमुळे गर्भवती स्त्री लवकर प्रसूत होऊ शकते. याशिवाय गर्भाशय अशक्त वा आकाराने लहान असणे, गर्भाशयात गाठी असणे, गर्भावस्थेत मानसिक ताण, भीती, नैराश्य यामुळेही प्रसूती लवकर होते. ३५ वर्षांपेक्षा अधिक आणि १८ वर्षांपेक्षा कमी वय असणारी स्त्री गर्भवती असेल किंवा गर्भधारणेपूर्वी वा गर्भारपणात मधुमेह किंवा रक्तदाबासारखा विकार असेल, दोन गर्भारपणामध्ये सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल अशा कारणांमुळेही प्रसूती लवकर होऊ शकते.
दररोज २४ ते २५ प्रसूतीयेथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दररोज २४ ते २५ महिलांची प्रसूती होते. यामध्ये ६० टक्के नार्मल तर ४० टक्के सिझर प्रसूतीचा समावेश असतो. कमी वजनाचे बाळ जन्मणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी असते.
बाळाची काळजी कशी?बाळाचे कपडे, अंथरुण- पांघरुण याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. बाहेरून आलेल्या व्यक्ती थेट त्या बाळाच्या संपर्कात येऊ देऊ नये. बाळाला घेऊन प्रवास करणे टाळावे. भूक कमी लागणे, पोट दुखणे असा त्रास होतो. त्यामुळे काळजी घ्यावी.
"अपुऱ्या दिवसात जन्मलेल्या बालकाचे वजन कमी असते. त्यामुळे शरीराची वाढही पुरेशी झालेली नसते. नऊ महिन्यानंतर प्रसूती होऊन जन्मलेल्या मुलाचे वजन अडीच ते तीन किलो असते. परंतु, लवकर जन्मलेल्या मुलाचे वजन काही वेळा एक किलोपेक्षाही कमी असल्याचे आढळते. योग्य ते उपचार करून घरी नेल्यानंतरही बरीच काळजी घ्यावी लागते."- डॉ. प्रशांत आखाडे, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय