गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात रोहयोअंतर्गत अहेरी व मुलचेरा या दोन तालुक्यात ७ हजार ३८३ कामे केली जाणार आहेत. त्यासाठी १९६ कोटी २४ लाख रूपयांचा खर्च येणार असल्याचे नियोजन रोहयो विभागाने केले आहे. या नियोजनाला जिल्हा परिषदेने मान्यता दिली असल्याने सदर नियोजन अंतिम राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीचा हंगाम संपल्यानंतर सर्वात मोठे रोजगाराचे साधन रोहयोच्या माध्यमातून निर्माण झाले आहे. त्यामुळे रोहयोच्या कामाची ग्रामीण भागातील मजूर आतुरतेने वाट बघत राहतात. रोहयो मजुराने वर्षाच्या कोणत्याही हंगामात कामाची मागणी केल्यानंतर त्याला १५ दिवसात रोजगार उपलब्ध करून देता यावा, यासाठी रोहयो विभाग आधीच नियोजन करते. या नियोजन आराखड्याला जिल्हा परिषदेची मान्यता घ्यावी लागते. त्याचबरोबर सदर नियोजन आराखडा माहितीसाठी केंद्र व राज्य शासनाकडेही पाठविला जातो. अहेरी व मुलचेरा हे दोन तालुके सर्वंकष विकास आराखड्यात मोडत नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या मार्फतीने येणाऱ्या कामाच्या मागणीवरून जिल्हा परिषदेचा रोहयो विभाग कामाचे नियोजन करते. अहेरी तालुक्यात एकूण ४० ग्रामपंचायती आहेत. २०१६-१७ या वर्षात सुमारे २ हजार ९६८ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ६३ कोटी ३५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी ग्रामपंचायतस्तरावर १ हजार ९९० कामे असून त्यासाठी ५० कोटी रूपये खर्च येणार आहे. यंत्रणास्तरावर ९७८ कामांचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी १३ कोटी ३४ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुलचेरा तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती असून या तालुक्यात ४ हजार ४१५ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १३२ कोटी ८९ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर ३ हजार ५६९ कामे आहेत. त्यासाठी ८७ कोटी रूपये खर्च येणार आहे. यंत्रणास्तरावर ८४६ कामांचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ४५ कोटी ८९ लाखांचा खर्च येणार आहे. दोन्ही तालुक्यात मिळून ७ हजार ३८३ कामे करण्याचे नियोजन केले असून त्यासाठी १९६ कोटी २४ लाखांचा खर्च येणार आहे. या नियोजनात राजीव गांधी सेवा केंद्र बोडी, मजगी, शेततळे, भातखाचर, सिंचन विहीर व ग्रामपंचायतीने सूचविलेली कामे केली जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
अहेरी व मुलचेरा तालुक्यात सात हजार कामांचे नियोजन
By admin | Published: March 14, 2016 1:30 AM