९९.८२ टक्के कामे पूर्ण : चावडी वाचनानंतर सातबारात झाला बदलदिगांबर जवादे । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅनलाईन झालेल्या सातबारामध्ये काही प्रमाणात त्रुटी राहिल्याने या त्रुटी दूर करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी राज्यभरात हाती घेण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात सदर काम आता अंतिम टप्प्यात आहे. एकूण सातबारांपैकी सुमारे ९९.८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामात गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चार वर्षांपूर्वी शासनाने राज्यभरातील सर्वच जमिनीचे सातबारे आॅनलाईन करण्याचे काम हाती घेतले. याही कामात गडचिरोली जिल्ह्याने आघाडी घेतली व आॅनलाईन सातबारे तयार करण्याचे काम एक वर्षापूर्वीच पूर्ण केले. आॅनलाईन सातबारांची संख्या ३ लाख ४५ हजार ३ एवढी आहे. सातबारा हा जमिनीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे या सातबारात काही त्रुट्या असल्यास त्या शेतकऱ्यांच्या मार्फत दुरूस्त व्हाव्या या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी चावडी वाचनाचा कार्यक्रम जिल्हाभरात आयोजित करण्यात आला होता. या चावडी वाचनादरम्यान नागरिकांनी आॅनलाईन सातबारातील काही त्रुटी दर्शविल्या. त्या त्रुटी दुरूस्त करण्यात आल्या. हे काम गडचिरोली जिल्ह्यात ९९.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. या तपासणीनंतर आणखी फेरतपासणी केली जाणार आहे. त्यासाठी तलाठी स्वतंत्र साफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. तलाठ्यांना याबाबतचे स्वतंत्र प्रशिक्षण दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्या अधिक गावांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. तालुकास्तरावर ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध असली तरी नेटची स्पीड अतिशय कमी आहे. अशाही परिस्थितीत येथील तलाठ्यांनी नियोजित वेळेत सातबारा आॅनलाईन करण्याचे काम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये तर अजूनपर्यंत सातबाराच आॅनलाईन झाले नाही. गडचिरोली जिल्ह्यात मात्र हे काम एक वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. फेरतपासणीचे उद्दिष्ट दिल्यानंतर सदर उद्दिष्ट सुध्दा नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. ही बाब इतर जिल्ह्यातील तलाठ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आॅनलाईन सातबारातदोन कॉलम कमीहस्तलिखीत सातबारामध्ये खालच्या बाजूस असलेल्या पिकांची नोंदवहीमध्ये एकूण १६ कॉलम होते. मात्र आॅनलाईन सातबारात शेवटचे दोन कॉलम कमी करण्यात आल्या आहेत. १५ व्या कॉलममध्ये जमीन करणाऱ्याचे नाव तर १६ वे कॉलम शेराशी संबंधित आहे. १५ व्या कॉलममध्ये त्यावर्षी प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याचे नाव तर शेरामध्ये शेतातील विहीर, झाड या संदर्भातील नोंदी घेतल्या जात होत्या. मात्र आॅनलाईन सातबारात ही दोन्ही कॉलम कमी झाले आहेत. सद्य:स्थितीत ज्याची जमीन आहे, तोच कसणारा राहत असल्याचे दाखविले जात असल्याने १५ व्या कॉलमची गरज राहिलेली नाही, अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सातबारा तपासणीचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Published: July 17, 2017 12:55 AM