लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गृह विभागाने गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. गडचिरोलीचे सध्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे.डॉ. अभिनव देशमुख हे १५ जून २०१६ रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. डॉ.देशमुख यांनी नक्षल चळवळ खिळखिळी केली. त्यांच्या कार्यकाळात ५० हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. यंदा ९ फेब्रुवारी रोजी नक्षल चळवळीतील फार जुना सदस्य व नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना व त्याची पत्नी पद्मा उर्फ समाक्का कोडापे यांना पोलिसांनी बल्लारपूर परिसरातून अटक केली होती. हे डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी होती. यंदा २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तब्बल ४० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात अले. पोलीस विभागाची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती. या कारवाईचे देशभरातून कौतुकही झाले. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए.राजा यांची उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.गडचिरोलीचे नवे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या अर्धांगिणी कादंबरी बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी आहेत.
शैलेश बलकवडे नवीन एसपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:31 AM